पुणे : राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा एक हजार १८ वर गेला आहे. तर बळींची संख्या ६४ पोहोचली आहे. एका दिवसात दीडशे रूग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. मुंबईतल्या वरळीत आणखी ४० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यामध्ये कोरोनाच्या दृष्टीकोनातून संवेदनशील बनलेल्या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील मंगळवार पेठ, नाना पेठ, रविवार पेठ तसेच भवानी पेठ या पेठा, कोंढवा, गुलटेकडी, स्वारगेट, कामगार पुतळा या दाट लोकवस्तीच्या भागात ही संचार बंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भागात कोरोणाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर आधीच सील करण्यात आला होता. असे असले तरी अंतर्गत भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचं निदर्शनास आले. अशा परिस्थितीत कोरोणाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाकडून संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.



अत्यावश्यक कारण वगळता या भागात पूर्णपणे संचारबंदी असेल. मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ही संचार बंदी लागू झालीय. १४ एप्रिल च्या रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. पुण्यातील खडक, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कोरोना प्रभावित भागांत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचाटबंदीची अंमलबाजवणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधी अंतर्गत रस्त्यांवर बॅरेकेडिंग करण्यात आले आहे.