पालघर : जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपीच्या सहवासातील इतर २० सहआरोपी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे सॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ एप्रिल रोजी झालेल्या या हत्याकांडातील २२ आरोपी वाडा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपींची कोरोना तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात आली असता सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते. दरम्यान या रुग्णांचे दुसरे अहवाल काल रात्री उशिराने प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी एक आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


या आरोपीला कोरनाचे कोणतेही लक्षणे दिसून येत नसले तरी त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. या आरोपीच्या सोबत असणारे इतर २० सहआरोपी तसेच २३ पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. या आरोपीच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांचे क्वारंटाईन करण्यासाठी डहाणू येथील आरोग्य पथक रवाना झाले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.