पुणे : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंत या सुविधांना स्थगिती देण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे. पुणे शहरातील कोरनाग्रस्त रुग्णांची संख्या १७ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाचं २४ तास विलगीकरण केलं जाईल. तपासणीनंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल. घरामध्ये वेगळं राहणाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्तांनी दिला आहे.


गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १८ संशयित दाखल झाले आहेत. यातल्या ३२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. १४ मार्चला अमेरिकेतून दुबईमार्गे भारतात आलेला रुग्ण पिंपरी-चिंचवडचा आहे, असं म्हैसकर म्हणाले.


पीएमपीएलच्या १,७१४ फेऱ्या १,१३१ वर आणल्या आहेत. प्रवासी संख्या १२ लाख वरुन ९ लाखांवर आणली आहे. एसटी बसने जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, तर येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया म्हैसकर यांनी दिली.


पुणे विभागातील ४ जिल्ह्यांमधले २३ जण विलगीकरण कक्षात आहेत. यातला एकही जण पॉझिटिव्ह आलेला नाही. शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किराणा भाजीपाला, दूध वगळता इतर सगळं बंद करण्यात आलं आहे. पब आणि बारही बंद केले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.


शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली असली, तरी आपत्तीच्या परिस्थितीमध्ये संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही. ससून रुग्णालयात ५० बेडचा आयसीयू सज्ज ठेवण्यात आल्याचं म्हैसकर यांनी सांगितलं.