दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. देशातल्या एकूण रुग्णांपैकी राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढच नाही तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्याही सर्वाधिक आहे. या नुकसानीबरोबरच महाराष्ट्राचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं आहे. राज्याला तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या तोट्यातून सावरण्यासाठी महाराष्ट्राला २ वर्ष लागण्याचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद आहेत. व्यापार ठप्प झाला आहे. याची मोठी आर्थिक किंमत राज्याला मोजावी लागणार आहे. पेट्रोलियम पदार्थांवरच्या मूल्यवर्धीत करात ४३६ कोटींच्या तुटीची शक्यता आहे. मार्च २०१९ मध्ये राज्याला ४२ हजार कोटींचा महसूल मिळाला होता. मार्च २०२० मध्ये हा महसूल घटून अवघा १७ हजार कोटी रुपये एवढा झाला. त्यामुळे जवळपास २५ हजार कोटींचा महसूल घटला आहे. 


संपूर्ण आर्थिक वर्षाचा हिशोब लावल्यास ३५ हजार कोटींच्या वर हा आर्थिक तोटा जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मंत्री आणि आमदारांच्या पगारात ३० टक्क्यांची कपात केली आहे. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांचा पगारही २ टप्प्यात देण्याची वेळ सरकारवर आली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने २ समित्यांची स्थापना केली आहे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. 


कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्याला किमान २ वर्ष लागतील, असं राज्यातल्या एका बड्या मंत्र्याने सांगितलं आहे. त्यामुळे कोरोनाची फार मोठी आर्थिक किंमत राज्याला मोजावी लागणार हे अधोरेखित झालं आहे.