औरंगाबाद : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता औरंगाबादमध्ये एक महिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ही महिला रशियातील कझागिस्तान इथून आली होती. सध्या, धुत रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२वर गेला आहे. राज्यातल्या ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यात सर्वात जास्त १५ रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.. 


राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


कोरोनाच्या रूग्ण संख्येत सध्या देशात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.