पुणे : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाडण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये, ही आमची प्राथमिकता असल्याचंही टोपे म्हणाले आहेत. 


मुंबईतली रुग्णसंख्या कमी होईल, पण मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे तिथे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 


आजच्या एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,५२,७६५ एवढी झाली आहे. तर सध्या ६५,८२९ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत.