मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांसमोर रोजच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, स्थलांतरित, बेघर तसंच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारची शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर राबवण्यात येणार आहे. एवढच नाही तर पुढचे ३ महिने शिवभोजन थाळी ५ रुपयात मिळणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारची शिवभोजन केंद्र सध्या जिल्हा स्तरावर सुरू आहेत, पण ही केंद्र आता तालुका स्तरावर सुरू होणार आहेत. याआधी १० रुपयांना मिळणारी ही थाळी आता ५ रुपयांना मिळणार आहे. शिवभोजन देणारी ही केंद्र सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील.


शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये एवढी आहे. शिवभोजन केंद्र चालवणाऱ्याला शहरी भागात उरलेले ४५ रुपये आणि ग्रामीण भागत उरलेले ३० रुपये अनुदान म्हणून राज्य सरकार देणार आहे. 


कोरोनाचा धोका लक्षात घेता शिवभोजन केंद्र चालवणाऱ्यांना स्वच्छता ठेवणं, निर्जंतुकीकरण करून घेणं, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणं आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.