गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात चोरट्या मार्गाने पुण्याच्या भोसरीतून ३५० किमीचं अंतर मोटार सायकलवर पार करून एक २१ वर्षीय युवक आला. त्याच्या नातेवाईकांकडे  आश्रयाला राहिला. १३  एप्रिलला त्याला त्याच्या भाओजीच्या आग्रहावरून जिल्हा रुगणालयात दाखल केल असता,तो कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रशासनाची आता तारांबळ उडाली,लॉकडाऊनमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने सर्व उपाययोजना केल्या असतांना आणि जिल्ह्यात एक ही कोरोनाबाधित रुग्ण नसताना पुण्यातून आलेल्या या कोरोना रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरीक भयभीत झाले आहेत. शिवाय हा रुग्ण त्याच्या बहिणीकडे  शहरातील एमआयडीसी परिसरात आश्रयास राहिला. त्यामुळे त्याच्या बहिणीच्या कुटुंबातील संपर्कात ९ जण आले.


तसेच बाईकवरून येताना बीड चेकपोस्टवर त्याला अडवलं असता तेथील त्याच्या संपर्कात आलेले पोलीस आणि इतर १४ जण आहेत. परभणीच्या ढालेगाव चेकपोस्टवर त्याला अडवलं असता तेथे ५ जण संपर्कात आले.  रुग्णालयात स्वॅब घेतांना देखरेख करीत असतांना डॉक्टर,नर्सेस रुग्णालयातील स्टाफ १३ जण त्याच्या संपर्कात आले होते,त्याच्यामुळे असे एकूण ४१  लोकांचे थ्रोट स्वॅब घ्यावे लागले.


४१ पैकी ३९ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले असले तरी पुन्हा ५ दिवसाने त्यांचे स्वॅब घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं, शिवाय एमआयडीसी परिसर सील करून शहरात तीन दिवसांची संचारबंदी लावावी लागली,यामुळे यंत्रणेवर ताण पडला,जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवेश करून तो बाधित युवक नातेवाईकांकडे राहिला,कुणी ही बाहेर जिल्ह्यातून आल्यास  जिल्हा प्रशासनानाला  माहिती देणे बंधनकारक असतांना त्याच्या नातेवाईकांनी ही माहिती दडवून ठेवली. शिवाय हा रूग्ण पॉसीटीव्ह आढळून आल्याने यंत्रणेची धावपळ झाली,यामुळे त्या तरुणासह त्याच्या नातेवाईकांवर कलम १८८,२६९,२७० व्यवस्थापन कायदान्वये नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाहेर जिल्ह्यातून कुणी ही लपून आलं असेल तर जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी नागरिकांना दिलेत. जर माहिती दडवून ठेवल्यास त्यांचा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगितलं आहे.