Coronavirus : कोरोना वाढत असताना राज्यात चाचण्यांची संख्या घटल्याने चिंता
Coronavirus : राज्यात एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता वाढली आहे.
मुंबई : Coronavirus : राज्यात एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता वाढली आहे. गणेशोत्सवात चाचण्या आणखी घटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टास्कफोर्स सातत्याने चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देत असताना त्यांच्या सूचनांकडे डोळेझाक का केली जातेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus) झालेल्या मुलांच्या संख्येत महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांमुळे चिंता वाढली आहे.
ऑगस्टमध्ये नऊ दिवस रोज दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी एक लाख ६० हजारच्या आगेमागे चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील आठ जिल्ह्यांत संसर्गदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण पाच जिल्ह्यांत आहेत. या कोरोनास्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
राज्यात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या आठवडाभरात 41,425 नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी मुंबई, पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांमध्ये 28,373 रुग्ण आढळले. तर दुसरीकडे कोरोनाबाधित झालेल्या मुलांच्या संख्येत महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यात जुलैपर्यंत 10 वर्षांखालील 2 लाख 18 तर 11 वर्षांवरील 4 लाख 63 हजार बालकांना कोरोनाची बाधा झाली. 11 वर्षांवरील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण अधिक आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्य़ापर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. 6 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार 10 वर्षांखालील 6738 बालकांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून बाधित बालकांच्या संख्येत 3.36 टक्क्यांनी वाढ झाली. तर 11 वर्षांवरील वयोगटात 18 हजार 413 बालके बाधित झाली. गेल्या महिनाभरात एकूण 25,151 बालकांना नव्याने करोनाची लागण झाली आहे.