मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे धोरण अवलंबण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २०,२२८ एवढी झाली आहे. तर राज्यात कोरोनामुळे ७७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ७२२ रुग्ण वाढले आहेत, तर २७ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२,८६४ एवढी आहे, तर आत्तापर्यंत मुंबईत ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनातुन बरे झाल्यामुळे ३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत एकूण ३,८०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आता केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातही कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वर्गवारी करून नवे धोरण अवलंबले आहेत. 


लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी


- लक्षणे नसलेल्या कोवीड रूग्णास ७व्या,८व्या आणि ९ व्या दिवशीही ताप नसल्यास त्याला १०व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा. यासाठी कोवीड चाचणी करण्याची गरज नाही
- डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास ७ दिवस होम क्वारंटाईन गरजेचे राहील
- डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या व्यक्तीला डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये दाखल करावे.


मध्यम लक्षणे असणारे रुग्ण-


३ दिवसांत रुग्णांमधील ताप कमी झाला असेल तर पुढील ४ दिवस ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त असेल अशांना लक्षणे सुरु झाल्यापासून १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा. या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोविड चाचणीची गरज नाही
- डिस्चार्जनंतर ७ दिवस होम क्वारंटाईन गरजेचे


गंभीर रुग्णांसाठी


या रुग्णांमध्ये लक्षणे येणे बंद झाली असतील  आणि त्यांचा कोविड चाचणीचा एक रिपोर्ट निगेटीव्ह आला असेल तर डिस्चार्ज दिला जावा
- ही कोवीड चाचणी लक्षणे कमी झाल्यानंतरच करण्यात येईल.
- या रुग्णांना लक्षणे  आढळल्यापासून डिस्चार्ज करेपर्यंतचा कालावधी हा किमान १० दिवस असावा.


यापूर्वी लक्षणे नसलेल्या तसंच मध्यम लक्षणे असलेल्यांची कोवीड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जायचा. तसंच गंभीर रूग्णांच्या डिस्चार्जसाठी त्यांचे २ रिपोर्ट निगेटिव्ह येणं गरजेचे होते, ते आता १ वर आणण्यात आलंय.  तसंच होम क्वारंटाईनचा कालावधीही १४ दिवसांवरून ७ दिवसांवर आणण्यात आला आहे.