प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड: रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात सध्या कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे. उरणमध्ये बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे ४४ नवे रुग्ण सापडल्याने सध्या रायगड पट्ट्यात मोठी खळबळ उडाली आहे. रेड झोनमध्ये असलेल्या उरणमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०६ वर जाऊन पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरणमधील करंजा हे गाव कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झाले आहे. या गावातील एक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उरणमधील कोरोना फैलावाला कारणीभूत मानला जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगदरम्यान ४३ वर्षांची एक व्यक्ती कोरोनाची मुख्य वाहक असल्याचे निष्पन्न झाले. ८ मे रोजी या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून हा व्यक्ती रुग्णालयात आहे. मात्र, त्यापूर्वीच या व्यक्तीमुळे करंजा गावातील अनेकांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. 



२४ एप्रिलला या व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला होता. यानंतर काही दिवसांतच ४ मे रोजी या व्यक्तीच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. साधारण १०० ते २०० लोक यावेळी उपस्थित होते. यानंतर बाहेरच्या गावातील नातेवाईकही या व्यक्तीच्या सांत्वनासाठी घरी येऊन गेले होते. तेव्हा या व्यक्तीच्या माध्यमातून करंजा आणि आजुबाजूच्या गावातील कोरोनाची लागण झाल्याचे समजते. आतापर्यंत करंजा गावात ९८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जमलेली गर्दी लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.