अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. पोलिसांकडून नागरिकांना घरातच राहण्याचं, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र काही नागरिकांकडून हे नियम तितकेसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाच्या वातावरणात लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याबरोबरच उपद्रवी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी पुण्यात अनोखं पथसंचलन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कात्रज परीसरात हे संचलन करण्यात आलं. पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील निम्म्या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील ४ दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळासाठीच्या उपाययोजना आखण्यात येणार आहेत. लॉकडाऊन तसंच संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 


दिल्लीतील मरकझला गेलेल्या लोकांचा शोध पूर्ण झाला असून त्याव्यतिरिक्त दिल्लीला प्रवास केलेल्यांसंदर्भात देखील योग्य ती कार्यवाही करण्यात आल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.के वेंकटेशम यांनी सांगितलं.


फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील मंगळवार पेठ, नाना पेठ, रविवार पेठ तसेच भवानी पेठ या पेठा, कोंढवा, गुलटेकडी, स्वारगेट, कामगार पुतळा या दाट लोकवस्तीच्या भागातही संचारबंदी आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर आधीच सील करण्यात आला होता. असं असलं तरी अंतर्गत भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाकडून संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारण वगळता या भागात पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली आहे. 


फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे

मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. १४ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. पुण्यातील खडकवासला, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस स्टेशन या हद्दीत येणाऱ्या कोरोना प्रभावित भागांत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीची अंमलबाजवणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अंतर्गत रस्त्यांवर बॅरेकेटिंग करण्यात आलं आहे.


पुण्यात गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोणामुळे १६ जणांचा मृत्यू झालाय. तर शहरात १२५हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.