शिर्डीत सरकारी आदेशाची ऐशीतैशी; परिक्रमा यात्रेसाठी हजारोंची गर्दी
लोक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून या व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे.
शिर्डी: संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शिर्डीमध्ये मात्र सरकारी आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून या व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व यात्रा, मेळावे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. कोरोनाच्या धास्तीमुळे राज्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. जेणेकरून लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, हा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, शिर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश खुंटीला टांगून ठेवल्याचे चित्र दिसत आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०२; भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद
शिर्डीत रविवारी शहराच्या सीमेला परिक्रमा घालण्यासाठी यात्रा आयोजित करण्यात आली होती. सरकारी आदेश धुडकावत हजारो भाविकांनी या यात्रेला उपस्थिती लावली. शिर्डी ग्रीन अँड क्लीनच्या सदस्यांनाही परिक्रमा यात्रा स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील सकाळी सहा वाजता शिर्डीतल्या खंडोबा मंदिरापासून ही यात्रा काढण्यात आली. परिक्रमा यात्रेत देशभरातून आलेले भाविक आणि शिर्डीचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे देखील यात्रेमध्ये सहभागी झाले होते. कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केल्याचं लोखंडे यांनी म्हटले. तर आदेश धुडकावल्याचं विचारताच त्यांनी रोज सकाळी लोक फिरतात, आजही फिरायला आलेत, असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला.
coronavirus : रेल्वेकडून एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढण्याचा निर्णय
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील देवस्थानांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. तरीही रविवारी ज्योतिबाच्या शेवटच्या खेट्याला भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेवरदेखील कोरोनाचे सावट आहे.