मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपल्या छोटेखानी भाषणात 'मुंबईचा नेहमी विचार हा सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणूनच झाला. पण, त्या कोंबडीची निगा राखणार कोण' असा प्रश्न केला. हाच धागा पकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेली तरी चालेल. पण, आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे उद्या सूप वाजत आहे. त्यामुळे आज विधानसभेत विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून ठाकरे सरकारच्या मंत्र्याच्या घोटाळ्याची यादीच बाहेर काढली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारमध्ये 'फक्त टेंडर पर टेंडर, नो सरेडर' असा घणाघात केलाय.


सीएम यांनी छोटेखानी का होईना पण काही तरी बोलले. ते म्हणाले, महाविकास आघाडी चांगले काम करते. निवडणूक पुरते घोषणा नाही म्हटले. पण त्यांनी बांधावर मदतीचे आश्वासन दिले होते हे ते विसरले का? या सरकारचे टीका, टोमणे या शिवाय काहीच होत नाही. मुंबई मनपातील सत्ताधारी मुंबईला सोन्याची अंडी देणारे कोंबडी समजते. पण, देशात फायनास मॅनेजमेंटमध्ये मुंबईपेक्षा नागपुर, नवी मुंबई पुढे आहेत.


मुख्यमंत्री भाषण चांगले देतात. पण, देण्याच्या नावाखाली लुटत आहेत. महापालिकेत कोव्हीड सेंटर घोटाळा झाला. कोव्हीड सेंटर उभारणी, साहित्य खरेदी, मनुष्य पुरवठा करण्यात घोटाळा. अर्ज नाही, टेंडर नाही. पण, पदाधिकारी आहे म्हणून त्याला काम देण्यात आले. ३८ कोटीचे काम देण्यात आले. पैसेही दिले, ज्याला अनुभव नाही अशा व्यक्तीला काम दिले.


ज्या कंपनीला पुणे येथे ब्लॅकलिस्ट केले. त्याच कंपनीला मुंबईत पाच कोविड सेंटरचे काम दिले. आशा कॅन्सर रिसर्च सेंटरला काम दिले पण ती संस्था रजिस्टर नाहीच. मुलूंडलाही या संस्थेस काम दिले. कोरोना काळात मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले. हजारो कोटीचे टेंडर कोरोना काळात आॅनलाईन मिटिंगमध्ये देण्यात आले.


मुंबई मेली तर चालेल. पण, यांचे स्वतःचे घर भरण्याचं काम सुरू आहे. मराठी माणसाला लुटणारे ते दैवत आणि त्याविरोधात आवाज उठणारे ते शत्रू. पण, आता नेमके शत्रू कोण हे सगळ्यांना लक्षात आले असा टोला फडणवीस यांनी लगावला.


मुंबई मलनिसरण (एसटीपी) कंत्राट सर्वात महाग आहे. देशात १.७० प्रत्येक एमएलटी आहे तर मुंबईत हाच दर ७ कोटी होता. त्यावरून कोर्टात गेलो. मनपाला चपराक दिला. जी गोष्टी दीड कोटींत होणार त्यासाठी सात कोटी रूपये खर्च? हे सगळे काम एकुण २५ हजार कोटीचे. या कामाकडे आमचे लक्ष आहे. जर ते योग्य पद्धतीने झाले नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


टेंडर पर टेंडर नो सरेडर अशी परिस्थिती असल्यामुळेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे ३०० कोटी संपत्ती सापडली. कोरोना काळात लोक मरत होती त्यावेळेस जाधव संपत्ती जमा करत होते, असा आरोप त्यांनी केला. 


असले शिकू नका


फडणवीस यांचे भाषण सुरु असताना भाजपा आमदार यांनी आम्हाला असले एक प्रशिक्षण द्या असे म्हटले. त्यावर फडणवीस यांनी, 'असले शिकू नका, नाही तर ओर्थर रोड जेलमध्ये जावं लागतं' असा उपरोधिक टोला लगावला.


आणखीही पेन ड्राईव्ह आहेत


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्हवरून टोला लगावला होता. त्यावरूनही अजित पवार यांच्याकडे पहात फडणवीस म्हणाले, कोण कोणाकडे जात होते. कशासाठी जात होते. त्याचे पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे. हवे असेल तर आजच देतो, असा टोमणा मारला.


मद्य विक्री आघाडी सरकार


सरकारला निर्णय घेण्यासाठी अक्कल लागत नाही. म्हणूनच की काय व्यसन मुक्तीसाठी काम करणारे अनिल अवचट यांना सकाळी श्रध्दांजली दिली आणि दुपारी कॅबिनेट वाईन किराना दुकानाला मुभा देण्याचा निर्णय घेतला गेला. महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाविनाश आघाडी, मद्य विक्री आघाडी सरकार असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.


ही आहे घोटाळ्याची यादी.. 


मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार
कोविड सेंटर उभारणीत घोटाळा
साहित्य खरेदीत घोटाळा 
उपकरण खरेदीत घोटाळा 
संचालन कंत्राटात घोटाळा 
मनुष्यबळ पुरवठ्यात सुद्धा घोटाळा 
डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा
फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदीत घोटाळा
पदाधिकार्‍यांच्या कंपन्यांनाच कामे
रेमडेसिवीर खरेदी घोटाळा
भंगारात घोटाळा
रस्ते चरभरणी घोटाळा
आश्रय योजनेत घोटाळा
पेंग्विन देखभालीत घोटाळा
ई-टेंडरमध्ये घोटाळा
नालेसफाईत घोटाळा
उद्यान विकासात घोटाळा
पम्पिंग स्टेशनमध्ये घोटाळा 
मालमत्ता कर वसुलीत घोटाळा
केईएम रूग्णालयात भ्रष्टाचार 
बेस्टच्या डिजिटल तिकिट निविदात घोटाळा
विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतही घोटाळा
बदल्यांमध्ये भ्रष्टाचार