मुंबई : राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल. राज्यात 14234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता पण काही ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली तर काही ठिकाणी मतदान होऊ शकलं नाही. त्यामुळे शुक्रवारी 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झालं आहे. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. ग्रामपंचायतींमध्ये गेल्यावेळी भाजपचं वर्चस्व दिसून आलं होतं. यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होईल. 


महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर पुणे जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी हे बंदीचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.



शिवाय आज रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुका काढणं, रॅली काढणं, फटाके फोडणं, गुलाल उधळायला पुणे जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. तर आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.