अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. राज्याचा विचार केला असता सुरुवातीला अमरावतीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती शहरात कोरोनाचे १० रुग्ण आहेत. दरम्यान,  जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यात काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत  कोविड-१९ महाराष्ट्र अधिकृत माहितीनुसार ६,४२७ रुग्ण असून २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर समाधानाची बाब म्हणजे ८४० रुग्ण ठणठणीत झाले आहेत. तर राज्यात ७७८ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण ८९,५६१ निगेटिव्ह चाचण्या आल्या आहेत.


अमरावतीत बुधवारी दोन वृद्ध महिलांचा कोरोना स्वॅब सॅम्पल रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी अमरावती शहरात आणखी दोन रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एक पॉझिटिव्ह ९५ वर्षीय वृद्ध आणि दुसरा मृत ६० वर्षीय वृद्धेचा नातू आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०वर गेली आहे. अमरावती शहरात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. 


पालिका क्षेत्रात कडक संचारबंदी


हे रुग्ण हाथीपुरा आणि हैदरपुरा परिसरातील आहे. रात्री उशिरा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन रात्रभर दक्ष होते. रुग्ण संख्या वाढत असल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आजपासून अमरावती महानगर पालिका क्षेत्रात केवळ मेडिकल सुरु राहतील. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, संचारबंदीचे नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामारे जा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.