वाढत्या कोरोनामुळे कठोर निर्बंध, प्रशासनानं घेतला महत्त्वाचा निर्णय
पुण्यामध्ये वाढत्या कोरोना संदर्भात प्रशासनानं आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री अजित पवारांसह, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पुणे: मुंबई-पुण्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. मुंबईतही 18 ठिकाणी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तर ठाणे, नवी मुंबईतही कठोड नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई, नागपूर, जळगाव पाठोपाठ पुण्यातही वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे.
पुण्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉटेल रेस्टोरंट्स रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर बंद करण्यासंदर्भात कठोर नियमावली राबवण्यात येणार आहे.
पुण्यामध्ये वाढत्या कोरोना संदर्भात प्रशासनानं आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री अजित पवारांसह, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीत कोरोनाविषयक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आहे.
पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही शिफारसी करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊन न करता काही कठोर निर्बंध घालायला हवेत. परीक्षा न घेणं हा उपाय नाही मात्र नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
देशातील टॉपटेन कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे पहिल्या तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कडक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे असं निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. लोकल , लग्नसराई आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभीत असल्याचंही त्यांच्या म्हणणं आहे.