पुणेकरांनो असे चोरीला जातात तुमचे मोबाईल! बसमध्ये चढण्यासाठी अल्पवयीन मुलं..; हा घ्या पुरावा
Mobile Thief In Pune: एका पुणेकर तरुणानेच बसस्टॉपवर उभा असताना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या त्याने केलेली पोस्ट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं घडलं काय आणि पुण्यातील कोणत्या भागात पाहूयात..
Mobile Thief In Pune: मुंबई, पुण्यासारख्या लोकसंख्या तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची गर्दी अधिक असलेल्या शहरांमध्ये मोबाईलचोरीचं प्रमाणे लक्षणीय आहे. अनेकदा रेल्वे, बस किंवा अगदी बाजाराच्या ठिकाणीही मोबाईल चोरीला जातात. मात्र आता या चोऱ्या लहान मुलांच्या माध्यमातून केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका पुणेकराने स्वत: मोबाईलमध्ये टीपला आहे. सध्या या व्यक्तीने पोस्ट केलेला फोटो आणि माहिती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पोस्ट चर्चेत
सोशल मीडियावर निखिल मोरे नावाच्या फोटोग्राफरने त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन निखिलने एक फोटो आणि त्याखाली नेमकं काय घडलं यासंदर्भातील तपशील दिला आहे. सदर प्रकार पुण्यातील चांदणी चौकात 1 एप्रिल रोजी घडल्याचं निखिलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
"आज चांदणी चौकात हायवेला निगडी बसची वाट पाहत उभा होतो. 11 वाजता दोन अल्पवयीन मुले बॅगा घेऊन उभी होती. बॅग पाहून समजत होत की बॅगेत काहीच नव्हतं.ही मुलं कोणतीही बस आली की उगीचच पुढे जायची चढायच्या हिशोबाने परंतु चढने टाळायची. त्यांची नजर माणसांच्या पॅण्टच्या खिश्यात असणार्या मोबाईलकडे असायची हे माझ्या लक्षात आलं. 2-3 वेळा असं झालं. मला शंका आली ( की नक्कीच हे दोघे मोबाईल चोर असणार) म्हणून पुढच्या वेळेस मी व्हिडिओ काढायचं ठरवलं. त्यातल्या एकाला हे लक्षात आल, लगेचच तो बसस्टॉप च्या पुढे चालायला लागला व कुणाला तरी कॉल केला. त्याने दुसर्याला ही खुणावलं होतं," असं निखिलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बसस्टॉप सोडून गेल्यानंतर काय घडलं?
ही दोन्ही अल्पवयीन मुलं बसस्टॉपवरुन पुढे गेल्यानंतर काय घडलं याबद्दल निखिलने, "दोघेही सर्विस रोड क्रॉस करून मधल्या रोड वर गेले लगेचच दोन पोरं बाईक घेऊन आले व हे दोघे बाईक वर बसून निघून गेले. म्हणजे माझी शंका 100% खरी होती. अगदीच लहान मुले अश्याप्रकारे सहज चोरी करू लागले आहेत. बस ला गर्दी असल्यामुळे आपण घाईत चढायला जातो परंतु आपला फोन गायब असतो," असं म्हटलं आहे. निखिलने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करताना आणि गर्दीच्या ठिकाणी फिरताना सतर्क रहा असा सल्लाही दिला आहे.
सावध राहा, फोन बॅगमध्ये ठेवा
तसेच निखिलने, "खरं तर मागच्याच महिन्यात (फेब्रुवारीमध्ये) माझा मोबाईल चोरला होता निगडीमधे देहूगावच्या बसस्टॉपला मोबाईल चोरीला गेला. मात्र एका तासातच मीच चोराला पकडला होता. तो सगळा अनुभव असल्यामुळे आजकाल फार दक्ष राहतो. तुम्ही सुद्धा बसस्टॉपवर असाल तर आजुबाजूला निरीक्षण करा आपला फोन बॅगेत ठेवा," असा सल्ला दिला आहे.