नागपूर : ज्या आरोपीला जमीन बळकावल्याच्या दोन प्रकरणात नागपूर पोलीस शोधत आहे... तोच आरोपी जर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात चक्क पहिल्या रांगेत बसलेला दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या 'राष्ट्रीय वयोश्री योजना' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. 


याच वेळी प्रेक्षकांच्या पहिल्याच रांगेत सर्वात समोर भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंसी बसला होता. जगदीश ग्वालबंसी याच्या विरोधात नागपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लोकांना धमकावून त्याच्या जमिनी बळकावल्याचे एक नव्हे तर दोन गुन्हे दाखल केले आहे.


दोन्ही प्रकरणात जगदीश ग्वालबंसीला अटक होणे अपेक्षित असून अद्याप पर्यंत त्याला अटक झालेली नाही, आणि आज तोच जगदीश ग्वालबंसी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पहिल्याच रांगेत बिनधास्त बसलेला दिसला, त्यामुळे नागपूर पोलिसांनी डोळे मिटले आहे का? किंवा राजकीय दबावात आता नागपूर पोलिसांनी जमीन बळकावण्याच्या प्रकरणात ग्वालबंसी याला अटक करण्याचे विचारच त्यागले आहे का?असा संशय निर्माण झाला आहे.


 विशेष म्हणजे ग्वालबंसी कुटुंबातील अनेक सदस्यांवर गेल्या काही दिवसात लोकांच्या जमिनी हडप केल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले असून त्यांना पोलीस शोधत आहेत.