सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरुन दोन गुन्हेगारांनी तिसऱ्या गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून (Murder) केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी (32 रा.पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने दोघांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधीर ऊर्फ बंडू गौतम थोरात (वय 32, रा. कुंभारवाडा, सदाशिव पेठ), संदीप ऊर्फ सॅन्डी सुरेंद्र नायर (वय 28, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नवी पेठेतील पूना हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता ही घटना उघडकीस आली.


याबाबत वैशाली गणपत जोरी (30) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद जोरी हा बंडू थोरात याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत होता. त्याचा थोरात याला राग होता. जोरी हा दारूच्या नशेत थोरात याला दिसला. त्यानंतर त्याने मित्र सँडी नायर याला सोबत घेऊन इतर मित्रासह बुधवारी रात्री नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आखाड पार्टी साजरी करण्याचा बेत आखला. 


त्यानुसार सर्वजण तेथे गेले. त्यानंतर सर्वजण दारु प्यायले. इतर व्यक्ती तेथून निघून गेल्या. शेवटी बंडू थोरात, जोरी व सँडी हे तिघेच तिथे थांबले होते. दोघांनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 


दरम्यान, गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या तेथून पायी जात असलेल्या एका नागरिकास जोरी याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने तात्काळ विश्रामबाग पोलिसांना याबाबत माहिती दिली.


पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळीचे निरीक्षण करुन उपलब्ध असलेले पुरावे व माहितीदारांनी दिलेल्या माहितीवरुन मृतदेहाची याची ओळख पटविली. खुनानंतर संदीप नायर व सुधीर थोरात हे संशयित धायरी भागात पळून गेल्याचे समजल्यावर विश्रामबाग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.


तिघेही सराईत गुन्हेगार


संदीप नायर याच्यावर गंभीर दुखापतीचे २ व जबरी चोरीचे १ असे ३ गुन्हे दाखल असून त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सुधीर थोरात याच्या विरुद्ध गंभीर दुखापतीचे २, घरफोडीचा १, इतर चोरीचे ७ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. तर आनंद जोरी याच्यावर घरफोडी चोरीचे ८, इतर चोरीचे २, फसवणुकीचा १, अमली पदार्थ १, तडीपार आदेशाचा भंग केल्याचे ३ असे एकूण १५ गुन्हे आहेत. तिघेही एकमेकांचे मित्र होते.