अमरावती : दोन आठवड्यांपूर्वी धो धो बसरणारा पाऊस अचानक गायब झाला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जवळपास महिन्याभरापासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. अशातच राज्यातील 77% पिकं धोक्यात आल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारच्या संस्थांनी काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीएआर आणि एनडीआरआयनं केलेल्या सर्वेक्षणानुसार हवामानातील तीव्र चढ-उतार, दुष्काळ आणि तकलादू जलसुरक्षा यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकूण 11 जिल्हे शेतीसाठी सर्वाधिक धोकादायक झाले आहेत. शेतीच्या दृष्टीनं 11 जिल्ह्यांमध्ये राज्याचे 40 टक्के पीकक्षेत्र आहे. तर 37 टक्के पीकक्षेत्र असलेले 14 जिल्हे मध्यम स्वरूपात आघातप्रवण झाले आहेत. वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रातील जवळपास 77 टक्के पिकं धोक्यात आली आहेत.  



पावसाअभावी पिकं सुकू लागली आहेत. तर ढगाळ वातावरणामुळे आहे त्या पिकावरही रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या अस्मानी संकटाचा सामना कसा करायचा हीच चिंता शेतक-यांना सतावत आहे. 


कधी ढगफुटी तर कधी पावसाची दडी, कधी कर्जबाजारीपणा तर कधी नापिकी शेतकऱ्यांमागचं दुष्टचक्र संपता संपत नाहीये. बळीराजा पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसलाय. ढगात पाणी नसलं तरी त्याच्या डोळ्यात मात्र आसवांचा पाऊस जमा झालाय.