दीपक भातुसे, मुंबई : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणलेल्या पिक विमा योजनेत शेतकऱ्यांऐवजी पिक विमा कंपन्यांनाच हजारो कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं समोर आलंय. राज्यातील समोर आलेल्या आकडेवारीनुसार पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची किरकोळ भरपाई देऊन बोळवण केल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे पिक विमा कंपन्यांनी मात्र यातून एका वर्षात तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात नफा कमावल्याचं समोर आलं आहे.


पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना नाहीच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यासाठी देशात २०१६ साली पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या या योजनेत प्रत्यक्ष उलटं झाल्याचं दिसून येतं. यात पिक विमा कंपन्यांच कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत असल्याचं चित्र आहे.


- विमा कंपन्यांना २०२० साली ५ हजार ८०१ कोटी रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला
- विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी केवळ ८२३ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली
- म्हणजेच एकट्या २०२० या एका वर्षात पिक विमा कंपन्यांनी ४ हजार ९७८ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला


कंपनी निहाय आकडेवारीवर


कंपनीचे नाव - जमा विमा हप्ता रक्कम - शेतकऱ्यांना दिलेली भरपाई - पिक विमा कंपन्यांना झालेला फायदा - भरपाईची टक्केवारी


HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी - ७००.४५ कोटी - २०३.०३ कोटी - ४९७.४२ - २८.९९
ईफ्को-टोकिओ इन्शुरन्स कंपनी - ९७८.७१ - १९९.९ - ७७८.८१ - २०.४२
भारती अॅक्सा इन्शुरन्स कंपनी - ६२९.३९ - १२१.६६ - ५०७.७३ - १९.३३
बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनी - ६६८.४४ - ८६.९७ - ५८१.४७ - १३.०१
रिलायन्स इन्शुरन्स कंपनी - १०३६.९७ - ११६.७४ - ९२०.२३ - ११.२६
भारतीय कृषी विमा कंपनी - १७८७.७६ - ९४.८९ - १६९२.८७ - ५.३१
एकूण - ५८०१.७३ - ८२३.१९ - ४९७८.५४ - १४.१९   


शेतकऱ्यांची किरकोळ भरपाईवर बोळवण


शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पिक विमा भरला. मात्र पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्यांना पिक विमा कंपन्यांकडून योग्य प्रमाणात भरपाई मिळाली नाही. काही ठिकाणी तर भरपाई नाकारण्यात आल्याचंही समोर आलं आहे. पिक विमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असतानाही शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई का दिली जात नाही याबाबत राज्य सरकारकडूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे याप्रकरणी सांगोल्याच्या एका शेतकऱ्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


विमा कंपन्यांनी एका वर्षात कमावला तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात नफा


केंद्र सरकारने पिक विम्याचे निकष ठरवले आहेत. हे निकष बदलण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला सूचना केल्या आहेत. केंद्र सरकार त्याचा अभ्यास करतंय, अशी माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांनी याप्रकरणी दिली आहे.


एकट्या २०२० सालात एक पिक विमा कंपनी एका दिवसाला १३ कोटी ६३ लाख एवढा नफा कमवत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतंय. त्यातही रिलायन्श इन्शूरन्स आणि भारतीय कृषी विमा कंपनी या दोन कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमावला आहे. पिक विमा योजना २०१६ साली लागू झाली, तेव्हापासूनचे विमा कंपन्यांचे नफ्याचे आकडे बघितले तर या कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर किती श्रीमंत झाल्या ते आपल्या लक्षात येईल. मात्र ज्याला केंद्रस्थानी ठेवून ही योजना तयार केली त्याची मात्र पिळवणूकच होत राहिली.


पिक विमा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी केला होता. तेव्हा शिवसेनेने पिक विमा कंपन्यांसमोर आंदोलनही केलं होतं. मात्र आता तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. तरीही दीड वर्षात पिक विमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावण्यात सरकारला यश आलेलं नाही. उलट या कालावधीत पिक विमा कंपन्यांच्या नफ्यात अधिकच वाढ झाल्याचं दिसून येतंय.