या जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, तरीही मुख्य भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी
राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर एक मे पर्यंत कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व आठवडा बाजार हे बंद करण्यात आले आहे.
अमरावती : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर एक मे पर्यंत कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व आठवडा बाजार हे बंद करण्यात आले आहे. यामध्ये मात्र सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. असे असले तरी येथील कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे बंधन आहे. दरम्यान, अमरावतीच्या मुख्य भाजी बाजार पेठेत मात्र व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी कोरोना नियमांचा फज्जा उडवण्याचा चित्र येथे दररोज पाहायला मिळत आहे. (Crowd at Amravati's main vegetable market.)
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी भाजी बाजार पेठ म्हणून अमरावतीच्या भाजी बाजार पेठेकडे पाहिल्या जाते. या बाजारपेठेत पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ यामधील हजारो शेतकरी आणि व्यापारी आपला शेतमाल घेऊन येतात. परंतु या बाजारपेठेत मात्र कोरोना नियमांचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मृत्यूचा आकडाही वाढत आहे. असे असताना बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण पोलिसांना जमलेले नाही. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असताना खरेदीसाठी गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या आधी इतवारा भागात गर्दी
दरम्यान, 16 एप्रिललाही मोठी गर्दी दिसून येत होती. अमरावतीतील इतवारा भागात या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला होता. नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिकांनी आपले दुकानच थाटले होते. त्यामुळे अमरावतीतल्या एका भागाला वेगळा नियम आणि अमरावतीला इतवारा भागाला वेगळा का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (Coronavirus in Amaravati) असे असताना नागरिक बिनधास्त दिसत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी इतवारा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली आहे.