अमर काणे, झी 24 तास, नागपूर : राज्याच्या उपराजधानीला अर्थात नागपूरला (Nagpur) नको असलेली ओळख मिळाली आहे. नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जात आहे. नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या रोगाने थैमान घातलंय. त्याला रोखण्यात सुरक्षा यंत्रणाही अपयशी ठरताना दिसतेय. तसेच या गुन्हेगारीच्या रोगाला रोखण्यासाठी त्यासाठी कोणतीही लसही नाही. दरम्यान नागपुरातील वारागंनांची वस्ती (रेड लाईट एरिया) अशी ओळख असलेल्या भागात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता तुम्हाला वाटेल की ही संचारबंदी कोरोनामुळे लावण्यात आली असावी, पण नाही. या संचारबंदी मागील कारण काही वेगळचं आहे. (Curfew imposed due to rising crime in Ganga jamuna red light area in Nagpur, decision of Commissioner of Police)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की कारण काय?  


या भागात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातंय. गुन्हेगारांचा वावरही आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहेत. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्रीही होत आहे, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. परिसरातील नगरसेवक आणि संबंधितांनी गंगाजमनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी बुधवारी रात्री गंगाजमुना सील केली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.


या रेडलाईट भागातील सर्व गल्ली-बोळावर पोलिसांनी बॅरिकॅटिंग केलंय. तसेच या भागात मोठा पोलिसांचा फौजफाटाही तैनात केलाय. देहविक्री करणाऱ्या महिलांना त्यांनी देह व्यवसाय करू नये, अशा सूचनाही त्यांना करण्यात आली आहे. 


गंगाजमुनाची झाडाझडती सुरू 


पोलिसांनी गंगाजमुनाची झाडाझडती सुरू केली आहे. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींची धरपकड सुरू आहे. गंगाजमुना वस्तीतील सर्व गल्लीबोळात पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. परिसरात देशी दारू, बियर शॉपी, वाईन शॉपचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठवले आहेत. तसेच  या भागातील अनधिकृत बांधकाम तोडण्याची विनंती महापालिकेकडे करण्यात आली आहे.


15 ऑगस्टपर्यंत सील काढा अन्यथा...


गंगा जमुना वस्ती सील 15 ऑगस्टपूर्वी काढा नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ज्वाला धोटे यांनी दिलाय. एरिया सील केल्यानंतर वारांगणांनी तीव्र  रोष व्यक्त केला. पोलिस स्वत:चे अपयश झाकण्याकरता लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही कारवाई करत असल्याच आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे.