Curfew : रात्री 8 नंतर बाहेर पडायचे असेल तर या गोष्टी जवळ असणं आवश्यक
राज्यात रात्री 8 नंतर कर्फ्यू असल्याने जवळ या गोष्टी बाळगावे लागणार
मुंबई : राज्यात सरकारने नव्या निर्बंधांची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने आणखी कठोर निर्बंध जारी केले आहेत. ज्यामुळे आता कोणालाही घराबाहेर पडायचे असेल तर त्यांच्याकडे आवश्यक कारण असणं गरजेचं आहे. कोणत्याही कारणा शिवाय रात्री 8 नंतर बाहेर फिरणं महागात पडू शकतं.
रात्री 8 नंतर राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 8 नंतर बाहेर पडायचं असेल तर कोणत्या गोष्टी जवळ असाव्यात आणि कोणाला 8 नंतर बाहेर पडण्याची परवानगी आहे. हे जाणून घ्या.
- ज्या व्यक्तींना रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे किंवा बस किंवा विमानातून प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे अधिकृत तिकिट असणं आवश्यक असणार आहे.
- औद्योगिक क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात त्यांच्याकडे ओळखपत्र हवं आहे.
- विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागतील. लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी असणार आहे.
- ज्यांच्या परीक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांना रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे हॉल तिकीट असावं.
- शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी नियम आणि अटीनुसार देण्यात येईल.
- घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेणार आहे.
कोणती कार्यालयं सुरु राहणार
- सेबी आणि सेबीकडून मान्यताप्राप्त संस्था - स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
- रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स
- सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
- सर्व मायक्रो फायनान्स संस्था
- सर्व वकिलांची कार्यालये
- कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)