प्रफुल्ल पवार / अलिबाग : Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वादळात जिल्‍हयात मोठया प्रमाणावर वित्‍तहानी झाल्‍याचे समोर आले आहे. वादळामुळे जिल्‍हयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अजूनही 661 गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. अंदाजे पाच हजार हेक्टरवरील शेतीबागायतींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी पहाटे  Tauktae चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला. रात्री उशीरा पर्यंत वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या सरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात कोसळत होत्या. ताशी 100 किलोमीटर वेगाने आलेल्या या वादळाने जिल्‍हयाची मोठ्या प्रमाणात वाताहत केली. लिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. वादळात चार जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी झाले. 10 घरे पुर्णतः पडली. तर 6 हजार 26 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.


वादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 299  गावांचा विज पुरवठा खंडीत झाला होता.  उच्चदाब वाहीनीचे  168 तर लघुदाब वाहिन्यांचे 426 खांब वादळात धारातीर्थी पडले, 12 ट्रान्‍सफार्मर्सचे वादळात नुकसान झाले. महावितरणच्या वतीने खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले, मात्र अद्यापही 661 गावांचा वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. या गावातील जवळपास दीड लाख ग्राहक अजूनही अंधारात आहेत. पुढील तीन ते चार दिवसात हा वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.जिल्‍हा मुख्‍यालय असलेल्‍या अलिबाग शहरात तब्‍बल 38 तास वीजपुरवठा खंडित होता. जिल्‍हयातील 150 मच्‍छीमार बोटींचे नुकसान झाले असून 125 जाळी तुटली आहेत.


रायगड जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. सर्व वादळग्रस्त गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंबा काजू आणि नारळ पोफळीच्‍या बागायतींना बसला आहे. कृषी विभागाच्या अंदाजा नुसार जिल्ह्यात साधारणपणे 5 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. उन्हाळी भात पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळग्रस्त विभागातील नुकसानीच्या पंचनामे करण्याचे काम सुरु कऱण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.