मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता आपण भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या पॅकेजची मागणी करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. या वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात दिसू लागला आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर घरावरील पत्रे उडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पेण, इंदापूर, माणगाव, रोहा, कोलाड, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, रत्नागिरी तसेच इतर किनारी भागांत वादळाचे तीव्र पडसाद उमटल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामा करण्याची करत आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे.


तसेच रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, खेड आणि चिपळूण, दापोली या विभागाला बसला असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान, नागरिकांनी संयम राखून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला वेळ द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदत करावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज अजित पवारांची मुंबईत भेट घेतली. यावेळी आर्थिक पॅकेज कोकणासाठी जाहीर करावे, अशीही तटकरे यांनी मागणी केली आहे. वादळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शेती, फळबाग, घरे, दुकाने, लहान व्यावसायिकांचे मिळून पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज तटकरे यांनी व्यक्त केला आहे.