मुंबई :  कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळाने नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सध्या सुरु असलेले निसर्ग चक्रीवादळ जाणकारांच्या म्हणण्यानुसार हे १८९१ नंतर प्रथमच कोकण किनकारपट्टीला धडकणारे पहिलेच चक्रीवादळ आहे. या वादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी ६० ते १०० किमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये तसेच प्रत्येकांने काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या वादळाचा परिणाम हा रात्री अधिक दिसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम सकाळी ८ वाजल्यापासून कळू शकणार आहे. तो ११ पर्यंत अधिक तीव्र असू शकतो. १२ ते ५ दरम्यान वादळ किनाऱ्यावर धडकेल. १०० ते १५० मीमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दोनदा बंगालच्या उपसागरात आणि दोन वेळा अरबी समुद्रात आले होते. हे मागील वर्षी पहिल्यांदा बघायला मिळाले होते. या वादळाने खूप नुकसान होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.


काय काळजी घ्यावी?


घरातच सुरक्षित राहावे


कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे  गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहिसलामत बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतू आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावे, दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, घरात राहण्यातच सर्वांचे हित आहे.


सर्व मच्छिमारबांधवांशी संपर्क


या चक्रीवादळाने नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून त्यांना घरी सुखरुप परत आणण्यात आले आहे. पालघरच्या मच्छिमार बांधवांशीही संपर्क झाला आहे. ते ही परत येत आहेत. पुढील दोन दिवस किंवा पुढची सुचना येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असेही ते म्हणाले. सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंतच्या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


चक्रीवादळात ही घ्या काळजी


मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आज दिली ते म्हणाले की, ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही. 


पुरसदृष्यस्थिती होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहेच परंतू दुर्देवाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे, पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी केले.


वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा, अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा. 


मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवण्याचे, बॅटरी, पॉवरबँक, मोबाईल चार्ज करून ठेवण्याचे आवाहन केले.  कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगून त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुचना ऐका, पाळा असेही नागरिकांना सांगितले.


सुरक्षितस्थळी जा, प्रशासनाला सहकार्य करा


राज्यातील सर्व स्थानिक प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . ते म्हणाले की धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षित स्थळी नेत आहे.  त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जावे, ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवावी, तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या