प्रफुल्ल पवार / अलिबाग, रायगड : एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट असताना दुसरीकडे रायगडकरांना निसर्गनिर्मित संकटांनाही सामोरे जावे लागत आहे. वर्षभरात आलेल्‍या दोन वादळांनी अक्षरशः दैना उडाली असली तरी रायगडकर हरलेला नाही . नव्‍या संकटांना सामोरे जाण्‍याची तयारी ठेवत त्‍याने आपला रोजचा दिनक्रम सुरुच ठेवला आहे. 3 जून 2020 रोजी आलेल्‍या निसर्ग चक्रीवादळाची नुसती आठवण आली तरी अंगावर काटा उभा राहतो. 2 जूनची रात्र सर्वांनीच जागून काढली. आणि दिवसाढवळया आलेल्‍या या संकटाने काही तासातच होत्‍याचे नव्‍हते केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक घरे उदध्‍वस्‍त झाली. अनेक सार्वजनिक इमारती, शाळांचे अतोनात नुकसान झाले. बागा आडव्‍या झाल्‍या. शासनाने आणि प्रशासनाने केलेल्‍या उपाययोजनांमुळे सुदैवाने मोठी जीवीतहानी टळली . परंतु ‘निसर्ग’ नावाच्या वादळाने निसर्गसंपन्न कोकणाची अवस्था अक्षरशः ‘निसर्ग’ विपन्न अशी करून टाकली. पश्चिम किनारपट्टीने पूर्वेसारखी तीव्र वादळे अनुभवलेली नव्‍हती ती प्रथमच अनुभवाला आली.



या चक्रीवादळानंतर शासकीय यंत्रणांबरोबरच स्‍वयंसेवी संस्‍थांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. कुणी पत्रे दिले कुणी जनरेटर दिले , कुणी अन्‍नधान्‍याचा पुरवठा केला . एरव्‍ही कधीही हार न मानणारा कोकणी माणूस निसर्गापुढे पुरता हतबल झाला होता . तरीदेखील एकमेकांचे अश्रू पुसत या संकटाला सामोरे जात होता. एरव्‍ही गुंठाभर जमिनीच्‍या हातभर बांधासाठी कोर्टकचेरया करणारा इथला माणूस एकमेकांना साथ देताना पहायला मिळाला.


मुख्‍यमंत्रयांसह अनेक मंत्री , विरोधी पक्षनेते यांचे दौरे झाले मदतीवरून राजकारण झाले. आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झडल्‍या अगदी केंद्र सरकारच्‍या पथकानेही इथल्‍या नुकसानीची पाहणी केली . कोटयवधींची सरकारी मदतही आली. परंतु ती मदत म्‍हणजे फाटलेल्‍या आभाळाला ठिगळ लावण्‍याचा प्रकार होता.



या संकटातून सावरण्‍याचा प्रयत्‍न सुरू असतानाच लागोपाठ दुसरा धकका बसला . मे महिन्‍याच्‍या मध्‍यावर आलेल्‍या तोत्‍के चक्रीवादळाने पुन्‍हा एकदा रायगडकर हादरले. पुन्‍हा घरादारांचे , बागांचे , सरकारी मालमत्‍तेचे अतोनात नुकसान झाले  वर्षभरात निसर्गाने दोन वेळा रायगडवर आघात केला. आता वादळाचे नाव काढले तरी अंगावर शहारे येतात.


या वादळांमुळे अनेक गोष्‍टी समोर आल्‍या .महत्‍वाचे म्‍हणजे आपल्‍या नियोजनातील त्रुटी . नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्‍यास आपण अजूनही खूप मागे आहोत हे या दोन वादळांनी दाखवून दिले . खरे तर नैसर्गिक आपत्‍ती दरवर्षीच्‍या पावसाळयात रायगडकर अनुभवत असतात . 2005 च्‍या जुलैमध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टी आणि दरडी कोसळण्‍याच्‍या घटनांमध्‍ये शेकडो निष्‍पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला . या आपत्‍तीत सर्व काही गमावलेल्‍या कुटुंबांचे पुनर्वसन हा मोठा प्रश्‍न होता . अनेक वर्षे हा प्रश्‍न सुटत नव्‍हता तो अलीकडच्‍या काळात सुटला . तरीदेखील दरडग्रस्‍त गावांच्‍या पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्यापही तसाच लोंबकळत आहे.



 यावरूनच आपण आपत्‍तीचा सामना आणि निवारणात किती मागे आहोत हे दिसून येते . यावेळच्‍या दोन चक्रीवादळांनी ही बाब अधोरेखित केली आहे. निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे मोठे नुकसान झाले . शेकडो गावे दीड ते दोन महिने अंधारात चाचपडत होती. त्‍यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्‍प झाल्‍या होत्‍या . कोकण किनारपटटीवरील विद्युत वितरण व्‍यवस्‍था तातडीने बदलून भुयारी वीजवितरण व्‍यवस्‍था उभी करणे किती गरजेचे आहे हे या निमित्‍ताने दिसून आले आहे.


निसर्ग वादळात मोठमोठी झाडे रस्‍त्‍यावर कोसळली होती. एनडीआरएफची टीम तैनात असूनही 4 ते 5 दिवसांपर्यंत अनेक गावांपर्यंत पोहोचता आले नव्‍हते . निसर्गच्‍या वेळी आणि नंतर तोत्‍के वादळाच्‍या वेळेस प्रशासनाने हजारो लोकांना वेळीच स्‍थलांतरीत केले त्‍यामुळे लोकांचे जीव वाचले. हे जरी खरे असले तरी शेल्‍टर होमचा विषय गेली अनेक वर्षे चघळला जात आहे. परंतु अद्यापही तडीस गेलेला नाही .  आता त्‍यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्‍या असल्‍या तरी त्‍या लालफितीत न अडकता त्‍यावर तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.


इथल्‍या निसर्गसंपन्‍न नारळी पोफळी आणि आंबा काजूच्‍या बागा हे खरे वैभव आहे. परंतु चक्रीवादळांनी याचे मोठे नुकसान केले. याच बागांवर वर्षभर आपला उदर निर्वाह करणारया कोकणी माणसाचा पोटापाण्‍याचा प्रश्‍न यामुळे निर्माण झाला . या बागा उभ्‍या रहायला आ‍णखी 10 ते 15 वर्षे लागतील. असं जरी असलं तरी रोपांची निर्मिती करून ती बागायतदारांना पुरवण्‍यात शासन अपयशी ठरले आहे.


नारळी पोफळीच्‍या बागा बहरायला , आंब्या काजूची  कलमे मोहरायला, फळे धरायला काही ऋतू जावे लागतील. पण तरीही इथल्‍या लाल मातीतली हिरवीगार उमेद कायम आहे. हीच उमेद कायम ठेवून, गरजणाऱ्या समुद्रासोबत आणि बरसणाऱ्या पावसासोबत  इथला माणूस , निसर्ग पुन्हा एकदा उभारी घेणार आहे. फक्‍त त्‍यासाठी मायबाप सरकारने पाठीवर हात ठेवण्‍याची गरज आहे.


 
'निसर्ग'नंतरच्‍या घडामोडी


1) शासनाकडून आलेली मदत. 447 कोटी 86 लाख 96 हजार 40 रूपये. तर मदतीचे वितरण 348 कोटी 73 लाख 8 हजार 74 रूपये


2) बोर्ली व दिघी येथे बहुउददेशीय चक्रीवादळ केंद्रांना मंजुरी, 26 ठिकाणी शाळांमध्‍ये निवारा केंद्र प्रस्‍तावीत


3) 924 ठिकाणी वीजरोधक यंत्रणांसाठी 31 कोटींचा केंद्र सरकारला प्रस्‍ताव


4) महाड येथे एनडीआरएफ युनिटचा केंद्र सरकारला प्रस्‍ताव


5) वापरात नसलेली गोदामात प्राणी निवारा केंद्र


6) किनारपटटीच्‍या शहरांमध्‍ये भूमिगत वीजवाहिन्‍यांचा प्रस्‍ताव


7) धूपप्रतिबंधक बंधारयांचा प्रस्‍ताव