गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ``दादर पॅसेंजर`` प्रवाशांनी तीन तास रोखून धरली.
रत्नागिरी : गणेशोत्सव साजरा करुन कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. रत्नागिरीतून बसणाऱ्या प्रवाशांसाठी दोन डबे आरक्षीत असताना, तळ कोकणातून, मडगावहून रेल्वे खचाखच भरून आली. त्यामुळे रत्नागिरीतील प्रवासी संतप्त झाले.
अभूतपूर्व गोंधळानंतर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस, रेल्वे स्थानकात दाखल झाले. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक एवढा होता की तीन तास ही रेल्वे प्रवाशांनी रोखून धरली. अखेर पोलिसांनी आरक्षित डब्यात घुसलेल्या प्रवाशांना जबरदस्तीने बाहेर काढलं आणि केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये बसवलं. तळकोकणातून आलेल्या या प्रवाशांना गाडीतून उतरवल्यामुळे तेही प्रवासी संतापले.
अखेर हे डबे रिकामे करून पोलिसांनी रत्नागिरीतील प्रवाशांसाठी आरक्षित डबे रिकामे केले आणि उतरवलेल्या प्रवाशांना केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये बसवून, अखेर दोन्ही रेल्वे मुंबईकडे रेल्वेने रवाना झाल्या.