कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली
दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली
रत्नागिरी : कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. रत्नागिरीत दादर पॅसेंजर दोन तासांपासून प्रवाशांनी रोखून धरली होती. आरक्षित डबे आधीच फूल झाल्यानं प्रवासी संतप्त झाले होते. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस स्थानकात दाखल झाले.
प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक एवढा होता की दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. अखेर पोलिसांनी आरक्षित डब्यात घुसलेल्या प्रवाशांना जबरदस्तीने बाहेर काढलं आणि केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये बसवलं.
तळकोकणातून आलेल्या या प्रवाशांना गाडीतून उतरवल्यामुळे आता ते प्रवासी संतापले. चिपळूण, खेड या शहरांसाठी आरक्षित असलेल्या बोगीत प्रवासी बसून आले होते. त्यामुळे या वादाला सुरूवात झाली होती.
अखेर हे डबे रिकामे करत यातल्या प्रवाशांना केरळा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आलं.