45 दिवस सप्तश्रींगी देवीचे दर्शन राहणार बंद
पावसाने मंदिराचे झालेल्या नुकसानाची होणार दुरुस्ती
सोनू भिडे, नाशिक- नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धपीठ एक आणि खान्देशची कुलदैवत सप्तश्रृंगी देवीचे दर्शन 45 दिवस बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी गडावर ढगफुटी सारखा पाऊस झाला होता. यात सहा भाविक ठार झाले होते.
काय झाली होती घटना
गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा परिमाण वणी येथील सप्तश्रींगी गडावर दिसून आला. सोमवारी ढगफुटी सारखा पाऊस झाला. त्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पावसाचा जोर अचानक वाढला. मंदिरातून खाली येणाऱ्या पायऱ्यांच्या संरक्षण भिंतीवरून पावसाचे पाणी पायऱ्यांवर आले. या पाण्यात दगड, मातीसह झाडेही वाहून गेली आहेत. या पावसानं गडावरील प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंदिर बंद ठेवण्याचे कारण
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या विश्वस्तांनी आता 45 (21 जुलै ते 5 सप्टेंबर) दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या 45 दिवसात मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पावसाने मंदिराचे नुकसान झाले असून या पंचेचाळीस दिवसात दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच या काळात सप्तश्रींगी देवीच्या गाभाऱ्याचेही दुरुस्ती केली जाणार आहे. भाविकांच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गाचेही नुकसान झाले असून त्याचीही दुरुस्ती केली जाणार आहे.
दर्शनासाठी पर्यायी व्यवस्था
भाविकांना सप्तश्रींगी देवीचे दर्शन न घेताच परतावे लागू नये यासाठी ट्रस्टने पर्यायी व्यवस्था केली आहे. पायथाच्या पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे. या ठिकाणी देवीचे दर्शन घेता येणार आहे.