Daund Crime: सातवीच्या विद्यार्थ्यानं वर्गातल्या मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थ्यानं प्रगती पुस्तकावर खोटी सही केली.वडिलांची खोटी सही केल्याची बाब विद्यार्थिनीनं शिक्षकांना सांगितली. याचा राग मनात धरुन विद्यार्थ्यानं मुलीच्या हत्येची चक्क सुपारी दिली. या प्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.या प्रकरणामुळे आता सुपारी देणं घेणं आता चक्क सातवीच्या वर्गापर्यंत पोहोचल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपारी देऊन हत्या घडवून आणणं आणि हल्ला घडवून आणणं या गोष्टी नेहमीच्याच झाल्यात. वर्तमानपत्रात टीव्हीवर हे आपण ऐकत असतो पाहत असतो.वाढत्या गुन्हेगारीचा आता बालमनावरही खोलवर परिणाम झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. दौंड शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेत सातवीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यांनं त्याच्याच वर्गातील मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना उजेडात आलीये.


संबधित मुलगा आणि मुलगी सातवीच्या वर्गात शिकतात. यातील मुलानं प्रगतीपुस्तकावर वडिलांची खोटी सही केली होती. खोट्या सहीची बाब वर्गातील मुलीला माहिती झाली होती. यानंतर मुलीनं त्याची तक्रार शिक्षकांकडं केली. मुलीनं तक्रार केल्याचा राग विद्यार्थ्याला आला. त्यानं सोबत शिकणाऱ्या मुलांना मुलीची सुपारी दिली. धक्कादायक म्हणजे यात मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करावी असं सांगितलं. याप्रकरणी दौंड पोलिसांत तक्रार दाखल झालीये. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून तपास सुरु केलाय.


गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बालमनावर विपरीत परिणाम करतायेत. तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जाते. पण शाळेत ते काय करतात. काय विचार करतात. कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवण्याची वेळ आलीये. शाळकरी मुलांपर्यंत सुपारीचं लोण पोहचल्यानं पालकवर्गानं अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झालीय.