सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) सांगलीतील सभेत कन्यादानासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्या व्यक्तव्यामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल मिटकरींचं ते भाषण
अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. मी एका लग्नात गेलो होतो. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते,'मम भार्या समर्पयामी'. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आरारारा... कधी सुधारणार. असं मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. 


अजित पवार यांची प्रतिक्रिया
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी त्यांना अमोल मिटकरी यांच्या ब्राह्मण समाजाबद्दलच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता ते संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना कुठल्याही राजकीय क्षेत्राच्या व्यक्तीने मत व्यक्त करत असताना कुठल्याही समाजाच्या तसेच कुठल्याही घटकाबद्दल बोलताना तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे असं अजित पवार म्हणाले.


माफी मागण्यास नकार
अमोल मिटकरी यांनी कन्यादानासंदर्भातील केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडूनही टीकेची झोड उठत आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, 'माझ्या बोलण्याचा भाजप आणि काही इतर संघटनांनी विपर्यास करून सांगितला. तसंच मला माफी मागायला सातत्याने सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही बदनामी करीत आहे. 


माझ्या पक्षाची अशी शिकवण नाही. तसेच शिव, शाहू फुले आंबेडकर, आण्णाभाऊ साठेंनी अशी कुणा धर्माविरूद्ध बोलावं अशी शिकवण दिलेली नाही'. असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहावा, मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाही, याला कोणीही जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करु नये असं मिटकरी यांनी म्हटलं होतं.


ब्राम्हण समाज आक्रमक
अमोल मिटकरींच्या या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला असू मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.