मी जिवंत आहे... गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत

सोमवारी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे जेष्ठ नेते बळवंत मोरे, शेतकरी जेष्ठ नेते सुभाष लोमटे, कॉम्रेड साथी रामराव जाधव आणि शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मी जिवंत आहे. मेल्याचे प्रमाणपत्र द्या असे गळ्यात फलक लटकवून येत कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
Parabhani News : कृषि विभागाचा सावळा गोंधळ, जिवंत मजुरांना दाखवले मृत,आंदोलना नंतर कामावर घेतले. यानंतर मी जिवंत आहे अशा गळ्यात पाट्या बांधून मजूर कार्यालयात आले. आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर चूक मान्य केली. कामावर रुजू होण्याचे लेखी आश्वासन दिले. परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा सावळा गोंधळ उघड झाला. मजुरांना मयत दाखविल्याने मजूर कायम सेवेत आले नाही. आमदारांकडून कारवाईची मागणी करण्यात आलेय.
परभणी जिल्ह्यातील कृषी विभागाअंतर्गत गंगाखेड, सेलू तालुक्यातील चिखलठाणा, जिंतूर आणि परभणी या चार कृषी बीज गुणन केंद्रातील कार्यरत असलेल्या जिवंत सहा मजुरांना कार्यालयीन अभिलेखात मृत दाखविल्याचा प्रताप समोर आला आहे.
शंकर थावरू राठोड, गंगुबाई राम जाधव, शिवाजी थावरू राठोड, जळवा रंगनाथ भालेराव हे सर्वजण कार्यरत तालुका कृषी बीज केंद्र गंगाखेड, हरिभाऊ नाथबाबा कार्यरत तालुका बीज केंद्र चिकलठाणा ता.सेलू, खाली माबी जैनुद्दीन फळ रोपवाटिका परभणी असे मयत दाखवण्यात आलेल्या मजुरांची नावे आहेत.
कृषी विभागाअंतर्गत तालुका कृषी बीज गुणन, केंद्र फळ रोपवाटिका येथे काम करत असलेल्या शेतमजुरास वर्षात २४०दिवस काम केले असता त्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याचा सन 2019 मधील शासन निर्णय आहे. सदरील निर्णय व या कामगारासंदर्भातील पूर्वीच्या कायद्यानुसार त्यांना कृषी विभागाने कायम करणे आवश्यक आहे.
कैक वर्षापासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आपण जिवंत असल्याचे सांगून ही लक्ष दिलं जात नव्हत,तुम्ही जिवंत असल्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा लागेल असे सांगितले जात होते, 240 दिवस काम करणाऱ्या मजुरांना कायम सेवेत घेण्याचा कायदा असतांना या मजुरांना मृत दाखविल्यामुळे त्यांना कायम सेवेत घेतले गेले नाही, तुमचा जिवंत असल्याचा कार्यालयीन प्रस्ताव सचिवांना पाठवू द्यावा लागेल अश्या सूचना करीत कृषी विभागाने अकलेचे तारे तोडले होते.
आमदार राहुल पाटिल यांनी कृषी अधिकाऱ्याला धारेवर धरले, आंदोलना नंतर कृषी अधीक्षक अधिकारी यांनी मयत दाखविलेल्या सर्व मजुरांना कामावर परत या असे लेखी आश्वासन दिले, त्यांनतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, यावेळी दीडशे पेक्षा अधिक मजूर 9 महिन्यापासून थकलेली पगार आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले होते झालेली चूक कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी त्या मजुरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु जाणीवपूर्वक अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,तंत्र अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली.