योगेश खरे /  नाशिक : राज्यात सध्या अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. त्यात अनेक संशयास्पद मृत्यू आहेत. नाशिक वनविभागात गेल्या २ वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू झालाय.. तर इतर मृत वन्यप्राण्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे. नुकतंच राजापूर अभयारण्यात हरिणांच्या शिकाऱ्यांना पकडून देण्यात आलं. शिकाऱ्यांच्या या मुक्त संचारामुळे वनविभाग आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावात ४ शिकाऱ्यांना रेंडाळा भागात हरणांची शिकार करताना पकडण्यात आलं होतं. या शिका-यांना खरवंडी गावच्या लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला. शिका-यांची गाडीही पेटवून दिली. मात्र आज शिकारी मोकाट फिरतायत अशी स्थिती आहे. कायद्यातल्या तरतुदीअभावी हे आरोपी जामीनावर मुक्त आहेत. आता पुन्हा अशाच घटना घडत असून पुन्हा स्थानिक नागरिकांनी आरोपींना पकडून दिले. 


स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून पकडलेल्या आरोपींचं धारिष्ट्य आता अधिक वाढताना दिसतंय. वन विभाग मात्र यावर काहीही बोलण्यास तयार नाही. अपुरं मनुष्यबळ, कायद्यातल्या पळवाटा, पोलिसांचं न मिळणारं सहाय्य अशी विविध कारणं सांगून वनविभागाचे अधिकारी आपले हात झटकत आहेत. 



गेल्या १० वर्षातली आकडेवारी पाहिली तर धक्कादायक वास्तव समोर येतंय. केवळ नाशिक विभागात गेल्या २ वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू झालाय. नाशिक वनविभागात बिबट्यांसह साडेचारशेहून अधिक वन्य जीवांचा मृत्यू झालाय. यात ६२ काळवीट, ५४ हरणं मारली गेलीयत. कोल्हे, तरस, मोर, कासवसह अनेक प्राण्याचा समावेश आहे. 


काही सवाल उपस्थित


१) शिका-यांनी मारून खाल्लेल्या प्राण्यांची मोजदाद कशी करणार?
2) नागरिक शिका-यांना पकडून देतायत, मग वनविभाग काय करतंय.
३)  पकडून दिलेले आरोपी सुटतातच कसे
४) गेल्या १० वर्षात एवढे प्राणी मारले गेले, तेव्हा वनविभाग नेमकं काय करत होतं
५) शिका-यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायद्यात सुधारणा का केल्या जात नाहीत