चंद्रपूर: रस्त्यांवरील खड्ड्यांनी थेट एका विद्यार्थिनीचा बळी घेतलाय. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे विविध मार्गांवर खड्ड्यांमुळे मार्गांची चाळण झालीय. हेच खड्डे चुकवत मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. काजल पाल असं या १८ वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. ती मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती.


अपघातानंतर परिसरात तणाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजल ही विद्यार्थीनी बंगाली कॅम्पकडून सावकार चौकाकडे जात होती. त्यावेळी रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांनी दुकानं बंद करुन प्रशासनाचा निषेध केला. शहरातील प्रमुख चौक आणि अंतर्गत मार्गांचीही दूरवस्था झाली असून २० दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेल्या मार्गात खड्डे झाल्याने नागरिक संतापलेत.


परिसरात घबराटीचे वातावरण


तरूण असलेल्या काजलचा मानवी चुकीमुळे मृत्यू झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर लहान बालक, आणि विद्यार्थ्यांना रस्त्यांवरून कसे सोडायचे हा प्रश्न पालकांना सतावत आहे. शाळेत जाताना, घरी परतताना या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.