अरुण मेहेत्रे, पुणे/ योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शिवाय २ लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार विशेष योजना आणण्याच्या तयारीत आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर तिचे किती लाभार्थी असतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. विनाअट असलेल्या या कर्जमाफीचे लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने काहीही सांगितलं नव्हतं. पण सरकारच्या अंदाजानुसार राज्यातल्या ३० लाख ५७ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून २१ हजार २०० कोटी रुपये जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा आहे त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचं सांगितलंय.


शेतकऱ्यांमध्ये मात्र अजूनही कर्जमाफीबाबत अनेक प्रश्न आणि अनेक शंका आहेत. त्याचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही


सरकारनं जाहीर केलेली ही कर्जमाफी योजना पार्ट-१ आहे असं म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळं शेतकरी कर्जमाफीची पार्ट-२ योजना काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


दरम्यान, ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीच्या निर्णयात बदल केला नाही तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचे ते म्हणाले . सरकारने व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बरे झाले असते. मात्र, आता यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर आम्हाला वेगळ्या भाषेत सांगावे लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.