Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं सत्ताधारी महायुतीचे (Mahayuti) नेते सैरभैर झालेत. पराभव नेमका का झाला, महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला का नाकारलं, याचं चिंतन करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेते धन्यता मानतायत. नाशिकमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर (NCP Ajit Pawar) फोडलंय. नाव न घेता गोडसेंनी राष्ट्रवादी आणि छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला. उमेदवारी उशिरा दिल्याचा इम्पॅक्ट पाहायाल मिळाला, विद्यमान असताना अनेक स्पर्धकांची नावं पुढे येत होती, त्यामुळे विलंब झाला आणि याचा फटका बसला असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय. तसंच भाजप, मनसे रिपाईच्या लोकांनी कामं केली. तर राष्ट्रवादीच्या काही लोकांनी केली तर काही लोकांनी कामं केली नाहीत, अता कोणी केली नाहीत हे जनतेला माहित आहे असा टोला हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचा भाजप, सेनेवर आरोप
दुसरीकडं बारामती आणि शिरूरमधील पराभवाचं खापर राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर फोडलंय. बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही पक्षांकडून मदत झाली नाही, असा थेट आरोप अमोल मिटकरींनी केला. राज्यभरात महायुतीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक मित्र पक्षांनी उमेदवार निवडून आण्यासाठी एकमेकांना मदत करणे अपेक्षित होतं. मात्र भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रामाणिकपणे मदत केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि शिरूरच्या उमेदवारांना दोन्ही पक्षाकडून मदत मिळाली नसल्याची नाराजी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली 


कोकणातही धुमशान
हे कमी झालं म्हणून की काय, कोकणातही वेगळंच धूमशान रंगलंय. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठा विजय मिळवला. त्यामुळं राणे पुत्रांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय की, त्यांनी राजापूर आणि उद्योगमंत्री उदय सामंतांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघांवरच दावा ठोकला. यावर राणे बंधूंनी सांभाळून बोलावं असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी दिलाय. नितेश राणे आणि निलेश राणे यांना काहीतरी बोलल्‍या शिवाय करमत नाही. एकतर त्‍यांना तिकीट मिळताना अडचण झाली होती. मुख्‍यमंत्रयांनी किरण सामंतांची समजूत काढली म्‍हणून त्‍यांना एवढी मते मिळाली. राणे बंधूनी सांभाळून बोलावे असा सूचक इशारा गोगावले यांनी दिलाय


भावना गवळी यांचा खळबळजनक दावा
दुसरीकडं भाजपनं केलेले सर्व्हे आणि उशिरा झालेलं जागावाटप यामुळं पराभव झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटानं केलाय.. तर मला तिकीट न देण्यासाठी शिंदेवर दबाव टाकण्यात आला, असा खळबळजनक दावा माजी खासदार भावना गवळींनी केलाय.


भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात आपापसातच जुंपलीय.. आधीच निकालानं महायुतीचे बारा वाजवलेत. आता एकमेकांची उणीदुणी काढण्यात महायुतीचे नेते धन्यवाद मानत असतील तर विधानसभा निवडणुकीचं काही खरं नाही, असंच म्हणावं लागेल.