मुंबई : Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी असं वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. यावरुन राज्यपाल यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 



'मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना !'


राज्यपाल यांच्या या विधानावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही टीका केली आहे. काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता...काय हा मराठी माणूस..महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.., असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.



थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?, अशा शब्दात संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.


प्रगत दृष्टी असलेला समाज, शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ, प्रबोधनाची मोठी परंपरा आणि व्यापार तसेच उद्योगस्नेही राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण असल्याशिवाय भांडवल येऊन संपत्तीची सतत निर्मिती होत राहत नाही. महाराष्ट्राच्या  राज्यपालांनी महाराष्ट्राचा हा इतिहास जाणला पाहिजे, असे ट्विट करत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.