किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात डेंग्युसह साथीच्या आजारांनी अक्षरशः थैमान घातलं आहे. डेंग्यूचा तर उद्रेक झाला असून नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे विक्रमी ३२२ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांनी तर सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. माघील काही वर्षांतील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी पाहता एकाच महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे. डेंग्यूबाबत शहर अलर्टवर गेल्याचे चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ महिन्यांत या आजाराने बाधित झालेल्यांची संख्या आता ८७१ वर पोहोचली आहे. आतापर्यंतची डेंग्यूच्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. तर साथीच्या आजारांनी डोकं वर काढत धुमाकूळ घातला आहे. 


ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती केली जाते आहे. पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांकडून घरभेटी दिल्या जात असून ठेकेदाराची माणसे असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना नागरिकांकडून प्रवेश नाकारला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत प्रभावी जागृती होत नसल्याचा दावा आता विभागाकडूनच केला जात आहे. 


साथीच्या आजारांचा आलेखही वाढता आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे २०७ रुग्ण होते, नोव्हेंबरमध्ये ही संख्या ३२२ वर गेली. 


- जूनमध्ये शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अवघी दोन होती. 
- मात्र जुलै महिन्यात शहरात डेंग्यूबाधितांचा आकडा एकदम ४८ वर पोहोचला.
- ऑगस्टमध्ये हा आकडा ११७ पर्यंत पोहोचल्याने शहरात डेंग्यूबाबत धोक्याची घंटा वाजली होती. 
- सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर सुरूच राहिल्याने या महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा १६५ वर पोहोचला होता.
- नाशिकमध्ये सध्या डेंग्यूचे ३२२, ताप ३३८०, अतिसार- ७८४, विषमज्वर १०८, कावीळ ७, मलेरियाचे २० रुग्ण आढळले आहेत.