लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले `अनेक योजना...`
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. कोल्हापुरात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
"आमच्या मुली सुरक्षित नाहीत सांगत लाडकी बहीण योजना बंद करा असं सांगत आहेत. आम्ही मुलींना सुरक्षित ठेवू आणि योजनाही सुरु ठेवू. कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हे कारणं शोधत आहेत," अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
"हे जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा स्थगिती देणारे होते. या ठिकाणी स्थगितीमान नव्हे तर गतीमान सरकार हवं आहे. नव्याने सरकार आलं तेव्हा जुन्या सरकारमधील योजना बंद करण्यात आल्या होत्या. पुन्हा निवडून द्या म्हणजे लाडकी बहीण योजना बंद करतो असा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही. पण आपण काळजी करु नका, काही झालं तरी मंचावरील भाऊ सक्षम आहेत. ते तुमच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील. लाडकी बहिणसह आमच्या मनात अनेक योजना आहेत, त्यादेखील उत्तम प्रकारे मांडू", असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
"राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता कोणतीच नाही. आम्ही ठरवलं आहे की, अशा घटनांमधील आरोपींना आम्ही सोडणार नाही. यांना कठोरातील कठोर शिक्षा, फाशी मिळेपर्यंत शांत बसायचं नाही असं ठरवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे सहन करणार नाही. मुलगी कुठलीही असली तरी ती आपलीच असते. कोलकात्यात एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक अत्याचार झाल्यानंतरही यांची तोंडं उघडली नाहीत. अत्याचार झाल्यानंतर ममता बॅनर्जींचं कौतुक करत राहिले. एका शब्दाने निंदा केली नाही. पण महाराष्ट्रात सरकारने, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याच्या मागण्या करत आहेत. रडायचं नाही तर लढायचं अशी शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आम्ही पळून जाणारे नाही. काही झालं तरी अशा नराधमांना समाप्त केल्याशिवाय मागे हटणार नाही असं सांगण्यासाठी मी आलो आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"त्यांना राजकारण करु द्या. एकाही मुलीवर, महिलेवर अत्याचार झाला तरी ते आपल्याला भूषणावह नाही. पण 2021, 2022 साली 4180 घटना घडल्या होत्या. 2023 मध्ये या घटना कमी झाल्या. ज्यावेळी संवेदनहीन होऊन आमच्याकडे बोट दाखवता तेव्हा आमच्याकडेही तुमचा लेखाजोखा आहे. पण तो मांडून आम्ही मोठे होणार नाही. समाजातील कीड आपल्याला संपवावी लागेल," असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.