Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गुरुवारी गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पार्थ पवार यांनी जाहीरपणे घरी जाऊन गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार गजा मारणेच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासह शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते. या भेटीमुळे विरोधकांकडून टीका होऊ लागली होती. दरम्यान अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली असून नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गजा मारणेच्या भेटीसाठी दाखल झाले होते. गजा मारणेची पत्नी जयश्री यावेळी उपस्थित होत्या. जयश्री मारणे राजकारणात असून मनसेच्या नगरसेविका होत्या. पार्थ पवारांनी गजा मारणे आणि जयश्री यांची भेट घेतल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. 


अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "अत्यंत चुकीची घटना आहे. हे असं घडू नये. मी भेट झाल्यावर पार्थला सांगेन. माझ्याकडून अशीच एकदा चूक घडली होती. त्यावेळी मी संबंधित व्यक्तीला तात्काळ पक्षातून काढून टाकलं होतं".


अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


 


मराठा आरक्षण आंदोलनावर ते म्हणाले की, "राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात लक्ष घालत आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी भांगे जरांगे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे".


"मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. चर्चेतून तोडगा निघत असतो. राज्याचे प्रमुख लक्ष घालत असताना आम्ही हस्तक्षेप करण्याची गरज नाही," असं अजित पवारांनी सांगितलं.  


रोहित पवारांच्या ईडी चौकशीबद्दल विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की, "कोणी काय आरोप करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर बोलावतात, आपण उत्तरं द्यायची असतात. माझीपण एसीबीने 5 तास चौकशी केली होती. आयकर विभागाचे लोक पण आले होते. आम्ही इतका प्रोपगंडा करत नाही. लोक गोळा करुन त्याचा इव्हेंट करत नाही. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे". 


बॅनरबाजीसंदर्भात विचारलं असता करू देत. माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत असं ते म्हणाले. तसंच जुन्नरमध्ये काळे झेंडे दाखवण्यासंबंधी ते मराठा आंदोलन नव्हते. तर ते उबाठाचे कार्यकर्ते होते असा आरोप केला. 


कोण आहे गजा मारणे?


गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला आहे. शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरुड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वाद सर्वश्रुत आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणी गजा मारणेला अटकही झाली होती. या प्रकरणी तो 3 वर्षं येरवडा जेलमध्ये होता. 


गजा मारणेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील एका व्यावसायिकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कोर्टाने त्याला गतवर्षी जामीन मंजूर केला होता.