Devendra Fadnavis On Eknath Shinde advertisement: लोकप्रियतेसंदर्भातील सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं छापलेल्या जाहिरातीमुळे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांना आज स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूर्णविराम दिला. पालघरमधील सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दोघांनी मुंबईमधून पालघरला जाताना एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमामधील भाषणात फडणवीस यांनी थेट जाहिरातीचा उल्लेख करत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना पूर्वविराम दिला.


फडणवीस नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरमधील कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी, "मी आणि मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरलो तेव्हा मीडियामधील एक बंधू आला आणि विचारलं तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला कसं वाटतंय? असे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षांचा आहे पण गेल्या वर्षभरामध्ये अधिक घट्ट झाला आहे. आमच्या प्रवासाची काळजी करण्याची कोणी करण्याची कारण नाही. तो कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबत राहणार कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही," असं विधान केलं.


तसेच पुढे बोलताना, "आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही. हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे यासाठी काम करतं. दीन, दलित, गरीब, आदिवासी, अल्पसंख्यांक, मजूर, शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांच्या जीवनात गुणात्मक बदल झाला पाहिजे म्हणून हे सरकार आलं. त्यामुळेच मला वाटतं की एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे काही होईल एवढं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही की ज्यामध्ये कोणी आधी भाषण करायचं कोणी नंतर भाषण करायचं यावरुन एकमेकांचा गळा पकडणारे आम्ही बघितलेत. हे सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे. जो पर्यंत सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार सदैव कार्यरत राहील," अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.


नेमका वाद काय?


नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये राज्यातील जनतेनं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याचं समोर आलं. त्यानंतर मंगळवारी राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेली जाहिरात शिंदे गटाकडून देण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळाल्याचा उल्लेख होता. तसेच ही जाहिरात 'देशात मोदी आणि राज्यात शिंदे' अशा मथळ्याखाली छापण्यात आलेली. या जाहिरातीवरुन भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही जाहिरात म्हणजेच खोडसाळपणा असल्याचं म्हटलं होतं. या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेली जाहिरात शिंदे गटाकडून देण्यात आली होती. या जाहिरातीच्या राजकारणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र आता या वादाला फडणवीस यांनी थेट भाषणातून उत्तर दिलं आहे.