पेण अर्बन बँक गैरव्यवहार: देशपांडे दाम्पत्याला अटक
पेणमधील शैलेश देशपांडे आणि प्रज्ञा देशपांडे दाम्पत्याला अटक
मुंबई : कोट्यवधी रूपयांच्या पेण अर्बन गैरव्यवहारातील मुख्य आरोपींना सहकार्य केल्याप्रकरणी पेणमधील शैलेश देशपांडे आणि प्रज्ञा देशपांडे दाम्पत्याला पेण पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोघेही बँकेच्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख सदस्य संतोष श्रुंगारपुरेंचे जवळचे नातेवाईक आहेत. बँकेने वाटप केलेल्या कर्जातून ज्या मालमत्ता खरेदी केल्या होत्या त्यापैकी काही जमिनी या दाम्पत्याच्या नावावर खरेदी करण्यात आल्या आहेत.
शैलेश देशपांडे यांच्या नावावर ३३ एकर तर प्रज्ञा देशपांडे यांच्या नावावर ६ एकर अशी एकूण ३९ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी अध्यक्ष शिशिर धारकर आणि तज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. बँकेच्या बेनामी कर्जातून १३१ एकर जमिनी ठिकठिकाणी विकत घेतल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.
सन २०१५ मध्येच न्यायालयाने या जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या असे आदेश दिले होते. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.