Devendra fadnavis on Natural Alliance: महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री बनून सत्तेत सहभागी झाले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काम करणार आहेत. दरम्यान या दोघांमध्ये नैसर्गिक युती कोणासोबत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस काय म्हणाले जाणून घेऊया. 


दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला मुख्यमंत्री बनायचंय हा विचार मी केला नव्हता पण आमचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत असावं हे माझं लक्ष्य होतं. आमचे सरकार तर आलेच पण आम्हाला इतक्या जागा मिळाल्या की मला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.  


एकनाथ शिंदे नाराज?


सत्तास्थापनेची चर्चा करताना एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावरदेखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे नाराज होते असं मला वाटत नाही. आमची मिटींग दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सुरु होती. त्यावेळी 'तुमच्या पार्टीचे इतके उमेदवार निवडून आलेयत तर तुमच्यावर मुख्यमंत्री होण्याचा दबाव असेल', असे ते मला म्हणाले. यावर मी त्यांना म्हणालो, 'सरकार बनले तर तुम्हाला सरकारमध्ये रहायला हवे.' मी मुख्यमंत्रीवरुन उपमुख्यमंत्री बनलो पण मला पार्टीने सांगितले आणि मी पार्टीचा निर्णय मान्य केल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेत सहभागी होणार की नाही?, याबद्दल विचार करुन सांगू अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने घेतली होती. यावेळी आपण तर शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. हिंदुत्वाची गळचेपी होते असे उद्धव ठाकरेंवर आरोप करत एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत आले. तर विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारदेखील सत्तेत सहभागी झाले होते.


कोणासोबतची युती नैसर्गिक?


दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील कुणाबरोबरची युती नैसर्गिक असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना शिवसेनेसोबतची युती नैसर्गिक आहे तर अजित पवार यांच्यासोबतची युती राजकीय असल्याचे उत्तर फडणवीसांनी दिले. 


उद्धव ठाकरेंवर टीका


माजी सहकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मूळातच 'भगवा डीएनए' आहे आणि त्यांनी डोक्यावर घेतलेल्या 'हिरव्या पोशाखा'मुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता असल्याची टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली.