पुणे : राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस बदल्यांसाठी राज्यात अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात पोलिसांच्या बदल्यांसह इतर बदल्यांवरून वाद सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना कोरोना काळात बदल्यांचा घाट कशाला घातला जातोय? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारचा बदल्यांचा निर्णय अनाकलनीय असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. बदल्यांमुळे सरकारला आर्थिक भुरदंड पडत असल्यामुळे बदल्यांची गरज नव्हती, असं मतही फडणवीसांनी मांडलं आहे. मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही, गरज पडली तर सोडून देईन, असं राज्याचे डीजी म्हणत असल्याच्या बातम्या समोर येत आहे, या गोष्टी अत्यंत गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले. 


राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा गोंधळ


फडणवीसांच्या या आरोपाला सरकारकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात एका महिन्यात दोन-तीन बदल्या होत होत्या, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 


अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनीही फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अनुभवाचे बोल बोलत आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं मलिक यांनी सांगितलं.