`उद्धव ठाकरे दिलदार मुख्यमंत्री, फडणवीसांना सत्ता नसलेलं सहन होत नाही`
शरद पवार आणि सोनिया गांधी असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: भाजपच्या राजस्थानमधील ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपला घोडेबाजाराची सवयच आहे. त्यांना पैशांचा उन्माद आहे. कर्नाटकात असताना मी हे सर्व अनुभवले होते. हे सर्व राजकीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
पायलट यांनी जाहीरपणे फडकावले बंडाचे निशाण, ३० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा
मात्र, महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती ओढावणार नाही, असा आशावादही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिलदार आहेत. तसेच शरद पवार आणि सोनिया गांधी असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, सत्ता नसलेलं त्यांना सहन होत नाही, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
काँग्रेसने राजस्थान वाचवले पाहिजे, अन्यथा देशभरात वेगळा संदेश जाईल- राऊत
दरम्यान, राजस्थानमध्ये अजूनही सत्तानाट्य सुरुच आहे. सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले असले तरी त्यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या बैठकीला काँग्रेसचे १००हून अधिक आमदार उपस्थित होते. त्यामुळे राजस्थान सरकारला कोणताही धोका नाही, असा गेहलोत यांच्या गटाचा दावा आहे. सध्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडून सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली जात आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही पायलट यांच्याशी संवाद साधला. या सगळ्यांनी सचिन पायलट यांना जयपूरमध्ये जाण्यास सांगितल्याचे समजते.