`सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?`
हे सगळे सुरु असताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे बसून होते.
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव मांडत या मुद्द्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये कामकाजातून काढून टाकली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
सावकरांबद्दलचे उद्गावर सभागृहाच्या पटलावरून काढण्यात आले. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आहोत की ब्रिटनमध्ये हा प्रश्न पडला आहे. ब्रिटनमध्ये सावरकरांवर बोलायला बंदी असू शकते. मात्र, महाराष्ट्राच्या सभागृहात हे घडणे दुर्दैवी आहे. हे सगळे सुरु असताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे बसून होते. त्यांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. सावकरांचा अपमान सहन करण्यासाठी लाचारी सहन करावी लागत असेल तर अशी सत्ता काय कामाची, अशी टीकाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शरद बोबडेंच्या अभिनंदन प्रस्तावावेळी ठाकरे-फडणवीसांमध्ये शाब्दिक जुगलबंदी
मात्र, आम्हाला सावरकरांविषयी बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग आमच्यावर हक्कभंगाची कारवाई झाली तरी चालेल. मात्र, आम्ही हे खपवून घेणार नाही. राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही संघर्ष सुरुच ठेवू, असेही फडणवीस यांनी सांगितले. तत्पूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावावेळीही सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.