Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din : संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. शिवराज्याभिषेक निमित्ताने अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले होते. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुणे जिल्ह्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान आपण उभारत आहोत. याचप्रमाणे मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित केली जाणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा प्रदर्शित केली जाईल. शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. तसेच रायगडावर राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तर रायगडाच्या पायथ्याशी 1ते 6 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रायगडावरुन दोन मोठ्या घोषणा केल्या आहे. प्रतापगड प्राधिकरण होणार असून, छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील. तर भरत गोगावलेच्या मागणीचीह दखल शिंदे यांनी घेतली आहे. रायगडावर शिवसृष्टी उभारणार असून, त्यासाठी 50 कोटींचा निधी दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील कोस्ट रोडला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रोड, असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.


शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजी नाट्य


दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा सुरु असताना नाराजी नाट्य रंगल्याचं दिसून आले आहे. शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा आहे. आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येतेय. राज्याभिषेकानंतरच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. सत्कार सोहळा आणि जाहीर कार्यक्रमातून ते बाहेर पडले. त्यांच्यासह आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. 


 नागपुरात 30 ढोलताशा पथकांची एकत्रित मानवंदना


तर दुसरीकडे राज्याची उपराजधानी नागपूरातही शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा कऱण्यात आला. महाल येथील शिवतिर्थावर शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या पालखीला 351 ध्वजांची सलामी देण्यात आली. मंगलस्नान, रुद्राभिषेक आणि विदर्भातील सात नद्यांच्याचं जलाभिषेक करण्यात आलं. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पूजा झाली. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील 30 ढोलताशा पथकांची एकत्रित मानवंदना देण्यात आली. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि हंबीरराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह मोहिते शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते.